लगाम न्यूज नेटवर्क
शिरोळ : पंचगंगा प्रदूषणाचा शिरोळ तालुक्यातील बर्याच गावांना त्रास होत आहे. कॅन्सरग्रस्तांचे प्रमाण देखील शिरोळ तालुक्यात या प्रदूषित पाण्यामुळेच वाढले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आंदोलन अंकुश संघटनेच्या पुढाकाराने गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन चालू आहे. याला मुख्यत्वे जबाबदार असलेल्या इचलकरंजीमधील प्रोसेस कंपन्यांचे पाणी ज्या काळ्या ओढ्याच्या मार्गे पंचगंगेत मिसळते, तो काळा ओढा आंदोलन अंकुश संघटनेने बंद करून एल्गार पुकारला होता.
यावर इचलकरंजी महापालिका महापौर व आयुक्त यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती समिती स्थापन केली होती. त्या समितीने दिनांक 29 एप्रिल रोजी प्रोसेस मालकांच्या कॉमन सी.ई.टी.पी. मधून बाहेर पडणारे पाणी शेतीला दिले जाते का..? प्रोसेसचे प्रदुषित पाणी ओढ्यातून नदीत जाते, याची पाहणी केली असता पाणी शेतीला दिल्याचे भासवून ओढ्यातून नदीत जात असल्याचे समितीला आढळून आले. तसा भेट अहवाल तयार करून तो महापालिकेला प्रदूषण मंडळाचे अधिकारी श्री. अंकुश पाटील यांनी सादर केला होता.
या अहवालाच्या आधारे सदर सी.ई.टी.पी. बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दिनांक 5 मे रोजी प्रदूषण मुक्ती समितीची महापौर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक इचलकरंजी महापालिकेत घेण्यात आली त्यामध्ये
1) सी.ई.टी.पी. चे बाहेर पडणारे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांचे संमती पत्रे घ्यावीत.
2) संमती पत्रे दिलेले शेतकरी पंचगंगा नदीतून पाणी उचल करतात तेथील वीज कनेक्शन तात्पुरते बंद करणे.
3) इचलकरंजी प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांचा तलाठी द्यायचा व त्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच ठिकाणी आहेत का याची खातराजमा जमा समितीने करायची.
वरील सर्व मुद्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत प्रोसेस बंद ठेवण्याच्या सूचना महापौर उदय धातुंडे यांनी या बैठकीत दिल्या होत्या.
5 मे पासून आज अखेर प्रोसेस मालकांनी पाणी कोणत्या शेतीला देणार आणि किती शेतकरी पाणी घ्यायला संमती दिली याची कागदपत्रे, संमती पत्रे दिलेली नाहीत.
महापालिकेचा निर्णय डावलून प्रोसेस चालू करण्याचा प्रयत्न :
काल रविवार दिनांक १० मे रोजी इचलकरंजी येथे प्रोसेस मालकांनी बैठक घेऊन आज सोमवार पासून रेटून प्रोसेस चालू करायचा निर्णय घेतला असल्याचे समजते. यावर आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, प्रदूषण मंडळाने इचलकरंजी सी.ई.टी.पी. ला परवानगी देताना प्रकल्पातुन प्रक्रिया केलेले पाणी शेतीला सोडण्याच्या अटीवर या प्रकल्पास परवानगी दिली असताना आणि प्रदूषण मुक्ती समितीने चालू करायची परवानगी दिलेली नसताना प्रोसेस बेकायदेशीर रित्या रेटून चालू करण्यात आल्यास आम्ही गुरुवार दिनांक 14 मे रोजी कोणतीही पूर्व सूचना न देता कुरुंदवाड येथील इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा रोखणार आहोत आणि त्याच ठिकाणी आमरण उपोषण सुरु करणार आहोत. यानंतर कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास याला प्रोसेस मालक जबाबदार असतील याची कृपया नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा