लगाम न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मेडिकल प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) केंद्र सरकारच्या मान्यतेने घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वर्षभर दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्ठा धक्का बसला आहे. विद्यार्थ्यांना आपली मानसिक स्थिती सांभाळून आता पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे.
NEET-UG 2026 परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. NTA ने यासंदर्भात काही महत्त्वाचे नियम आणि पुढील प्रक्रिया स्पष्ट केली आहे. परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि तपास यंत्रणांच्या अहवालानंतर केंद्र सरकारच्या मान्यतेने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
आता पुढे काय? NTA ची सविस्तर नियमावली :
१) पुन्हा परीक्षा होणार
NTA ने स्पष्ट केले आहे की, NEET-UG 2026 ची फेरपरीक्षा घेतली जाईल. नवीन तारखेची घोषणा अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना सतत NTA च्या वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२) पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही
ज्या विद्यार्थ्यांनी आधीच 2026 च्या परीक्षेसाठी अर्ज भरला होता, त्यांची माहिती आणि उमेदवारी कायम ठेवली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरण्याची किंवा पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. आधीचा अर्ज फेरपरीक्षेसाठी वैध राहील.
३) अतिरिक्त फी आकारली जाणार नाही
फेरपरीक्षेसाठी कोणतीही अतिरिक्त परीक्षा फी घेतली जाणार नसल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे. आधी भरलेली फीच ग्राह्य मानली जाईल.
४) जुन्या Admit Card बाबत निर्णय
विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करावे लागू शकते. परीक्षा केंद्र किंवा वेळ बदलण्याची शक्यता असल्याने नवीन हॉलतिकीट जारी होण्याची शक्यता आहे.
५) परीक्षा केंद्रांमध्ये बदल शक्य
गैरप्रकार टाळण्यासाठी काही संवेदनशील परीक्षा केंद्रे बदलली जाऊ शकतात. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
६) CBI तपास सुरू
पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे या प्रकरणाचा तपास CBI कडे देण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील संशयित नेटवर्क आणि मध्यस्थांची चौकशी सुरू आहे. काही ठिकाणी पोलिसांनी चौकशी आणि अटक कारवाईही सुरू केली आहे.
७) विद्यार्थ्यांमध्ये संताप
परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर अथक मेहनत घेतली होती. पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याने मानसिक ताण वाढल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
८) राजकीय प्रतिक्रिया
विरोधी पक्षांनी केंद्र सरकार आणि NTA वर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ” झाल्याचा आरोप केला. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि पेपर माफियांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
९) सोशल मीडियावर संतापाची लाट
#NEETCancel आणि #NTAFail सारखे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.
१०) विद्यार्थ्यांसाठी NTA चा सल्ला
NTA ने विद्यार्थ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत वेबसाइट आणि नोटिफिकेशनद्वारेच माहिती तपासावी, असे सांगण्यात आले आहे.
सध्या लाखो विद्यार्थी नवीन परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा करत आहेत. देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET संदर्भातील हा निर्णय शिक्षण व्यवस्थेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा