श्री.दत्त शिरोळला सर्वोत्तम ऊस विकासाचा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार



(लगाम न्यूज नेटवर्क) 

शिरोळ : सन 2024 -2025 या हंगामासाठी उच्च साखर उतारा असलेल्या क्षेत्रातील सर्वोत्तम ऊस विकास या श्रेणीतील प्रथम पुरस्कार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांचेवतीने देण्यात आला.    


राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या नवी दिल्ली येथे आयोजित भव्य वार्षिक समारंभात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शुभ हस्ते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.  कारखान्याचे वतीने सदरचा पुरस्कार उद्यान पंडित गणपतराव पाटील व चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्वीकारला.




श्री. दत्त कारखान्याच्या सन 2024-2025 चा हंगाम आव्हानात्मक असतानाही,  कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. कारखान्याने सादर केलेल्या माहितीच्या आधारे भारत सरकारच्या मुख्य संचालकांच्या(साखर) अध्यक्षतेखाली तज्ञांच्या पुरस्कार निवड समितीने कार्यक्षमता पुरस्कार 2024 -25 चे निकाल निश्चित केले होते. त्यामध्ये श्री दत्त साखर कारखान्यास उच्च साखर उतारा असलेल्या क्षेत्रातील सर्वोत्तम ऊस विकास या श्रेणीतील प्रथम पुरस्कार देऊन आज दि. 22 सप्टेंबर रोजी सन्मानित करण्यात आले. श्री दत्त कारखान्याच्या स्वतंत्र ऊस विकास विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीच्या पूर्व मशागती पासून ते ऊस पिक गाळपापर्यंतचे मार्गदर्शन देण्यात येते. यामध्ये सेंद्रिय कर्ब 0.23 टक्के पासून 0.87 टक्के पर्यंत वाढविण्यासाठी सलग दहा वर्षे प्रयत्न, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये 27% बियाणे बदल, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, मोफत माती, पाने, पाणी परीक्षण व मोफत सल्ला, पाचट व्यवस्थापन, सभासदांना रासायनिक, जैविक व सेंद्रिय खतांचा पुरवठा, सेंद्रिय ऊस उत्पादन करून सेंद्रिय साखर निर्मिती, नाविन्यपूर्ण क्षारपड चोपण जमीन सुधारण्याकरिता सछीद्र निचरा प्रणालीचा दहा हजार एकरावरती वापर करून, ऊस उत्पादन वाढविण्यामध्ये कारखान्याने हातभार लावला आहे. याची विशेष नोंद घेण्यात आली. 


यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुण कुमार देसाई, इंद्रजीत पाटील, बसगोंडा पाटील,निजामसो पाटील, अमर यादव, दरगु माने गावडे, ऍड प्रमोद पाटील, महेंद्र बागे, ज्योतीकुमार पाटील, सुरेश कांबळे, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील हालसवडे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मिस्त्री, कार्यकारी संचालक संजीव देसाई, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना, ऊस विकास अधिकारी ए.एस. पाटील उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने