कुरुंदवाड : नंदकुमार सुतार सर
येथील पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त स.पो.नि.शितलकुमार डोईजड यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वीचे सपोनि संतोष माने यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे शितलकुमार डोईजड यांची नियुक्ती झाली असून त्यांनी संतोष माने यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.
शितलकुमार डोईजड यांची पंधरा वर्षे सेवा झाली असून, २०१२ मध्ये ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले. त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात गोंदिया येथून सुरू केली असून गडचिरोली, विरार, पुन्हा गडचिरोली, राधानगरी, कोडोली, कोल्हापूर मुख्यालय, पुणे ग्रामीण, वडगाव मावळ, शाहूपुरी येथे सेवा केली आहे.
गडचिरोली येथे सेवा करीत असताना त्यांनी दोन वेळा आपल्या पथकासह नक्षलवाद्यावर हल्ला करून तीन नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या या धाडसी नक्षलवादी मोहिमेसाठी त्यांना२०१७ साली पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तर २०१८ साली त्यांना राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले होते.
येथील पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देणार असून चुकीची कामे करणाऱ्यांची गय करणार नाही. तर अवैद्य धंदे पूर्णपणे बंद करणार असून, दररोज पोलीस ठाण्यात येणाऱ्या उपद्रवी लोकांचा बंदोबस्त करणार आहे. तसेच समाज विघटन करणाऱ्या लोकांवरही कारवाई करणार आहे. शाळा महाविद्यालयातील मुलींना रोडरोमीओ अथवा विद्यार्थ्यांच्याकडून त्रास होणार नाही, यासाठी पोलीस ठाण्याकडून योग्य ती काळजी घेऊन कारवाईचा बडगा उगारणार आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गावातील तक्रारदार नागरिकांनी कोणत्याही एजंट किंवा दलाला मार्फत न येता आपल्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा