5000 दर जाहीर केल्याशिवाय उसाला हात लावून देऊ नका : धनाजी चुडमुंगे



लगाम न्यूज नेटवर्क 


कनवाड : दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचा तुटवडा निर्माण होऊन ऊस हंगाम फ़क्त 80 दिवसावर आलेला आहे. पाऊसमान कमी झाल्याने उसाची म्हणावी तेव्हडी वाढ अजून झालेली नाही. त्यामुळे यावर्षी ऊस तोडी घ्यायला गडबड न करता शेतकऱ्यांनी पाणी पाजून बांधावर बसून रहावे. जोपर्यंत कारखाने 5 हजार दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत उसाला हात लावून देऊ नका असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी कनवाड येथे केले.



आज सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी कनवाड येथील मेडिकल चौकात झालेल्या जागर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मीया बुखारी इनामदार होते. अंकुश संघटनेचे विकास शेषवरे यांनी स्वागत केले तर, कामिल बाबा इनामदार यांनी आभार मानले. या सभेत बोलताना संघटनेचे दिपक पाटील म्हणाले की, आंदोलनास यंदा चांगली घात आहे. नेटाने आंदोलन केल्यास यावर्षी उसाला 5000 पर्यंत दर मिळू शकतो. कृष्णा देशमुख यांनीही शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी सारखी एकजूट ठेऊन, ऊस तोडी नाकारल्यास शेतकऱ्यांना निश्चित चांगला भाव मिळणार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.



या जागर सभेला मार्गदर्शन करताना धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले की, गेल्या 4 हंगामापासून आपल्या भागातील सगळेच कारखाने मोठया नफ्यात चालले आहेत. या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. अशी आमच्या संघटनेची भूमिका असून, संघटनेच्या भूमिकेला कनवाड मधील ऊस उत्पादकांनी साथ द्यावी. जोपर्यंत उसाला परवडणारा दर जाहीर होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. शेतकऱ्यांनीही आमच्या बरोबर रस्त्यावरच्या लढाईला तयार रहावे. असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. राकेश जगदाळे, राहत हुसेन इनामदार, अहमद इनामदार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. 



यावेळी श्रीपाल आरसगुंडा,शशी कांबळे,नूरूल इनामदार,वाजिद अली इनामदार,मुस्तफा इनामदार,रफिक इनामदार,सिद्धार्थ चौगुले,संभा खाडे,के एन इनामदार,राजू मुजावर,सिकंदर बारगीर,बंडू गौराज,शंकर कुप्पाडे,संभा खाडे व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने