साखरेला मिळणाऱ्या दराप्रमाणे आमच्या ऊसाला दर द्या : धनाजी चुडमुंगे




लगाम न्यूज नेटवर्क 

शेडशाळ : आगामी ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश संघटनेकडून गावागावात जागर सभा घेतल्या जात असून, ऊस दरासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे काम अंकुश संघटनेकडून प्रत्येक हंगामापूर्वी केले जाते. याच अनुषंगाने शेडशाळमध्ये झालेल्या जागर सभेत बोलत असताना संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी "उसाचा दर हा बाजारातील साखरेचा दर ठरवत असतो. पुढील वर्षभरात साखर दर हे चढेच राहणार आहेत, या वाढलेल्या साखर दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळायचा असेल, तर शेतकऱ्यांनी उसाचा दर ठरल्याशिवाय ऊस तोडी घेऊ नयेत असे आवाहन शेतकऱ्यांना केले.



महादेव स्वामी मठात काल (दि. 1 ऑक्टोबर ) झालेल्या सभेत बोलताना ते पुढे म्हणाले की,  सरकार आणि कारखानदार या दोघांचे धोरण हे ऊस उत्पादकांना लुटण्याचे आहे. कारखान्यांनी कितीही आग्रह केला तरी, शेतकऱ्यांनी इतक्यात ऊस तोडी घ्यायच्या नाहीत. ऊस तोड आणखी महिनाभर पुढे गेल्यास उसाची वाढ होणार आहे. त्यातून आणखी चार ते पाच टन जादा उसाचे उत्पादन निघणार आहे आणि हंगाम चालू न झाल्यास कारखान्यांना उसाचा दर वाढवून द्यावा लागणार आहे. थोडा धीर धरल्यास शेतकऱ्यांचा फायदाच फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आमच्या बांधावरच्या लढ्याला पाठींबा द्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.




सदर जागर सभेला भास्कर गावडे, भारत ढाले, संभाजी माने, भाऊसाहेब शिरढोणे, गजानन लाड, वर्धमान शिरढोणे, अविनाश भोसले, सचिन तकडे, अनिल सौदत्ते, सुनील मालगावे, अनिल जगनाडे, तसेच शेडशाळ परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


कारखान्यांना साखरेला जो बाजारात दर मिळतो. तितकाचं उसाला दर त्यांनी आजपर्यंत दिलेला आहे. 2016 ला कारखान्यांनी साखर 2400 ने विकली होती. त्यावेळी त्यांनी उसाला 2500 रुपये च्या आसपास दर दिला आहे. येत्या वर्षभरात साखरेचा बाजारातील दर हा 50 रुपये च्या पुढेच राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला 5000 रुपये दर देणे त्यांना सहज शक्य आहे.

धनाजी चुडमुंगे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने