शिरोळ पोलिसांचा मनमानी कारभार ; साखर कारखानदारांना साथ.... ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ मधून भुषण गंगावने यांना घेतले ताब्यात.

धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची कारवाई





लगाम न्यूज नेटवर्क 

शिरोळ : ऊस दराच्या प्रश्नावरून शिरोळ तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले असून, ऊस आंदोलन आता अधिक चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोल्हापूर येथे झालेला ऊसदराचा तोडगा मान्य नसल्याची भूमिका घेत आंदोलन अंकुश संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संघटनेच्या भूमिकेला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, अनेक शेतकऱ्यांनी ऊस तोडी नाकारून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.



दरम्यान, शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आणि आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता शिरोळ तालुक्यातील दत्त साखर कारखाना आणि टाकळीवाडी येथील गुरुदत्त कारखान्यांनी आंदोलन थांबेपर्यंत ऊस तोडी न देण्याचा पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. 



आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने योग्य आणि समाधानकारक ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडी देऊ नयेत, यासाठी गावोगावी जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या दरासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन संघटनेकडून करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई शिरोळ पोलिसांकडून सुरू झाल्याने या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


 

दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री उदगाव येथून आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, देवेंद्र चौगुले, अचिन हेरवाडे, उदय होगले आणि दत्तात्रय जगदाळे यांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी शिरोळ येथून भुषण गंगावने तसेच आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडणाऱ्या आणि आंदोलनाची जनजागृती करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सलग कारवाई होत असल्याने शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.



आंदोलकांवर कारवाई, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काय..?


ऊसदराचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसताना आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या पोलिसांच्या भूमिकेमुळे शिरोळ तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत असेल, तर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडायच्या तरी कुणाकडे, असा सवाल उपस्थित होत आहे.



पोलिसांच्या या कारवाईमागे नेमकी कोणती कायदेशीर कारणे आहेत, तसेच ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.



दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त केला जात असून, ऊसदराचा प्रश्न चर्चेतून सोडविण्याऐवजी आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकरी व आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.



एकीकडे शेतकऱ्यांना योग्य ऊसदर मिळावा, यासाठी आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे आंदोलनातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना, तसेच आंदोलन अंकुश संघटनेला मानणाऱ्यांना देखील ताब्यात घेण्याचे सत्र सुरू झाल्याने शिरोळ तालुक्यातील ऊस आंदोलनाला आता कोणते वळण मिळणार...? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने