कनवाड म्हैशाळ बंधाऱा बांधत असताना, नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. या बाधित शेतकऱ्यांना वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही दिला गेलेला नाही. सदर वाहून गेलेल्या जमीनिंचे पंचनामे होऊन आठ महिने झाले आहेत. पण वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला काय आजतागायत शेतकऱ्यांना मिळाला नाही. तसेच धरणाचे बांधकाम ज्या ठिकाणी होणार आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा भूसंपादनाचा मोबदला अद्याप दिलेला नाही.
त्याबाबतीत गेल्या एक महिन्यापुर्वी शेतकऱ्यांनी काम थांबाविले होते. त्यावेळेस शिरोळ तालुक्याचे आमदार यड्रावकर यांनी आपल्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची बैठक घेऊन एक महिनाभरामध्ये मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देऊ, तोपर्यंत वाहून जाणाऱ्या जमिनीला संरक्षक बांध घालण्यास परवानगी द्यावी. अशी विनंती शेतकऱ्यांना केली होती. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी बांध घालण्यास परवानगी दिली होती .
पण प्रत्यक्षात बांधाचे काम बाजूला ठेवून धरणाचे काम सुरू करण्यात आले . त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून नाकावर टिचून कनवाड हद्दीत धरणाचे काम सुरू झालेले होते. त्यामुळे काल गुरुवार दिनांक 05 मार्च रोजी सायंकाळी संतप्त शेतकऱ्यांनी धरणाच्या साईटवर जाऊन प्रत्यक्षात सुरू असलेले काम बंद पाडून सर्व जेसीबी, पोकलेन मशीन, डंपर बाहेर काढून म्हैशाळकडे रवाना केली. पण आज शुक्रवारी पुन्हा धरणाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला व पुन्हा शेतकर्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला.
यावेळी पाटबंधारे खात्याने शिरोळ पोलिसांना आणून शेतकऱ्यांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. शिरोळ पोलिसांनी देखील कोणतीही लेखी तक्रार दाखल नसताना दडपशाहिने शेतकर्यांना शिरोळ पोलिस स्टेशन मध्ये आणले. यावेळी आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे व त्यांच्या टिमने तात्काळ पोलिस स्टेशन गाठले व पोलिसांना या दडपशाहीबद्दल विचारणा केली.
शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी मध्यस्थी करून सोमवारी याबाबत तहसीलदारांच्या दालनात बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले, पण शेतकऱ्यांनी बैठक होऊन जमिनीच्या मोबदला संदर्भात तोडगा निघत नाही तोपर्यंत काम सुरू करू दिले जाणार नाही असा इशारा दिला आहे.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, मुस्तफा इणामदार, पोपट राणे, संभाजी माने, वाजिदली इनामदार, संभाजी जाधव, इरफान इनामदार, कृष्णा देशमुख , तय्यब इनामदार, रियाज इनामदार, लक्ष्मण भोसले ,सत्तार पटेल, राहुल माने, पप्पू इनामदार ,दादासो खाडे, नबीपटेल यांच्यासोबतच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा