डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 1 मार्च रोजी राबविण्यात आले शोषखड्डा अभियान ; कोरोची, चिपरी, जयसिंगपूर आणि इनाम धामणी भागात काढले तब्बल 110 शोषखड्डे

 


शिरोळ प्रतिनिधी :  लगाम न्यूज नेटवर्क 


रेवदंडा, ता.अलिबाग, जिल्हा. रायगड येथील डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने भारताचे स्वच्छता दूत महाराष्ट्र भूषण डॉ.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ.श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 1 मार्च 2026 रोजी सकाळी 8 पासून रात्री 9 पर्यंत कोरोची, चिपरी, जयसिंगपूर आणि इनाम धामणी या ठिकाणी शोषखड्डा अभियान राबवण्यात आले. 




सदरच्या शोषखड्डा अभियानामुळे ज्यांची सांडपाणी जाण्याची व्यवस्था नाही. तसेच सांडपाण्यामुळे होणारे रोग, पाण्याची नासाडी आणि दुर्गंधी या सर्व समस्यांवर योग्य उपाय म्हणून प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांमार्फत प्रत्येक ठिकाणी जाऊन, नागरिकांना मार्गदर्शन करून 110 शोषखड्डे प्रतिष्ठान मार्फत श्रमदानातून विना मोबदला पूर्ण करण्यात आले.




* समाजाभिमुख उपक्रम राबवणारे धर्माधिकारी प्रतिष्ठान : 

डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक समाजाभिमुख उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाज रुणांची जाणीव ठेवत हे प्रतिष्ठान सातत्याने विविध समाज उपयोगी उपक्रम साकार करत आहे. वृक्षारोपण आणि संगोपन, शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना विनामूल्य वाटप, रक्तदान शिबिरे, निशुल्क आरोग्य निदान आणि उपचार शिबिरे, आरोग्य विषयक जनजागृती शिबिरे, पानपोयांची निर्मिती, कालवे, सरोवरे नद्या आणि धरणांमधील गाळाचा उपसा करणे, स्पर्धा परीक्षा आणि व्यवसायासाठी मार्गदर्शन शिबिरे, दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचे वाटप, शारीरिक दृष्ट्या अक्षम आणि मूकबधिर व्यक्तींना आवश्यक त्या अवयव व उपकरणांचे वाटप आदी उपक्रम प्रतिष्ठान तर्फे राबविण्यात येतात. स्वच्छता अभियान हा यापैकीच एक होय.

       

डॉ.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्र सरकारने 26 जानेवारी 2017 रोजी पद्मश्री पुरस्कार जाहीर केला.डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने गेले अनेक वर्षे व्यापक स्वरूपात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून, दिनांक 16 नोव्हेंबर 2014 रोजी च्या स्वच्छता अभियानाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.


* स्वच्छतेचा प्रारंभ स्वतःपासून केल्यास स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल : 

 स्वच्छतेबरोबर स्वच्छतेबाबत सर्व स्तरांमध्ये जनजागृती हा या स्वच्छता अभियानाचा मुख्य हेतू आहे. अस्वच्छतेमुळे विषमज्वर, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो सारखे साथीचे रोग पसरण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत असते. अस्वच्छतेचे पर्यावरणावर हानिकारक परिणाम होतात. हे टाळण्यासाठी समाजाने पुढे येण्याची नितांत गरज आहे. समाज एक कुटुंबच आहे आणि मीही त्याचाच एक घटक आहे. त्यामुळे मलाही सामाजिक कर्तव्य आहेत, याची जाणीव प्रत्येकाला होणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून स्वयंशिस्तीचा अधिकार केल्यास भारत जगातील सर्वात स्वच्छ आणि स्वच्छतेसाठी जागरूक देश म्हणून ओळखला जाईल, असा श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ठाम विश्वास आहे. जसे आपले घर आपण स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतो, त्याप्रमाणे आपले गाव, आपले शहर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. सरकारी यंत्रणेला असणाऱ्या मर्यादांचा विचार करता आपले घर, आपला समाज व आपल्या देशाच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने पुढे येऊन हातभार लावल्यास स्वच्छ भारत उपक्रम यशस्वी होईल. यासाठी हे प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने