शिरोळ नगरपरिषदेतर्फे घरकुल मेळावा संपन्न ; घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी शिरोळ नगरपरिषद प्रयत्नशील : पदाधिकाऱ्यांचे आश्वासन




शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क 

शिरोळ नगरपरिषदेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) संदर्भात आयोजित करण्यात आलेला घरकुल मेळावा आज बुधवार दिनांक 11 मार्च रोजी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडला. या मेळाव्यास नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नगररचना विभाग प्रमुख सचिन गाडेकर यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे मेळाव्यात स्वागत केले. त्यानंतर उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. प्रास्ताविकात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत शिरोळ नगरपरिषद ह‌द्दीतील लाभार्थी संख्याचा आढावा सांगितला. PMAY 1.0 अंतर्गत आतापर्यंत १५४ लाभार्थ्यांना तर PMAY 2.0 अंतर्गत १०६ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे व काही तांत्रिक त्रुटींमुळे ११ घरकुल प्रकरणे नामंजूर करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.अपूर्ण घरकुल बांधकाम असलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक त्या सूचना व नोटीस देण्यात आली. 




यावेळी १३ घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेश प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच कबुलायत जमिनीवरील नागरिकांना तसेच स्वतःची जागा नसलेल्या पात्र नागरिकांना घरकुलाचा लाभ कशा प्रकारे मिळू शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या नागरिकांबाबत २०१९ च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या अटी व शर्तीस अधीन अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले.


यानंतर उपस्थित नागरिकांच्या घरकुल संदर्भातील विविध शंकांचे निरसन नगररचना विभाग प्रमुख सचिन गाडेकर, PMAY शहरस्तर तांत्रिक तज्ञ अभिषेक कोळी तसेच जिल्हा समन्वयक अशोक कोरे यांनी केले. तसेच घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष मदत केली. तसेच शंका विचारणाऱ्या नागरिकांची नावे, शंका व संपर्क क्रमांक नोंदवून घेण्यात आले.


या घरकुल मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शिरोळ नगरपरिषद नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने