कनवाड प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
म्हैशाळ बंधाऱ्याच्या ठेकेदाराने कृष्णा नदीमध्ये कामासाठी चुकीचा बांध घातल्यामुळे आणि तो पावसाळ्यापूर्वी काढला नसल्यामुळे कनवाड येथील जमीन वाहून गेली. कनवाड मधील ज्या शेतकर्यांची जमीन वाहून गेली आहे, ते शेतकरी आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. शेतकर्यांनी बंधार्याचे काम थांबवून, त्याठिकाणी मंडप घालून आंदोलन चालू ठेवले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र या शेतकर्यांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. आंदोलनाची अजूनही गांभीर्याने दाखल घेण्यात आलेली नाही.
शेतकरी त्यांच्या मागण्या मान्य करा म्हणत, गेले कित्येक दिवस काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पण तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने याकडे पूर्णपणे डोळेझाक करून दडपशाहीचा वापर करून ठेकेदारलाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण शेतकरी सुद्धा आपल्या मागण्यावर ठाम असून भविष्यामध्ये याही पेक्षा उग्र आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतला आहे .
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, वाजिद इनामदार, संभाजी जाधव, खालीद इनामदार, अमर खाडे, हमीद पटेल, मोहम्मद इनामदार व बाधित शेतकरी उपस्थित होते.
आंदोलक शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या :
1) वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला तात्काळ मिळाला पाहिजे.
2) भविष्यात ब्यारेजच्या प्रभावामुळे कनवाड हद्दीतील जमिनीस धोका आहे. त्यामुळे वाहून गेलेल्या जमिनीस संरक्षक बांध घालावा
3) ब्यारेजच्या कामासाठी पोच रस्ता,भराव तसेच पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळावा.
4) ब्यारेजच्या खालील शिरोळ तालुक्यातील गावांना उन्हाळ्यामध्ये शुद्ध पाणी मिळण्यासाठी धरणामध्ये राखीव साठा असला पाहिजे .
टिप्पणी पोस्ट करा