घालवाड मध्ये 25 मि. लाईट गेल्यावर शिरोळमधील जवळपास 6000 नागरिकांना आज पाणी नाही ; शिरोळकरांना वेळेवर पुरेसे आणि शुद्ध पाणी मिळणार कधी...?

गटातटाच्या राजकारणात सर्वसामान्यांचे हाल...




लगाम न्यूज नेटवर्क 


शिरोळ :  आज शनिवार दिनांक 16 मे रोजी शिरोळमधील समतानगर भागात पाणी आले नाही. एक दिवस आड का होईना, एकदम बारीक का असेना, खरं पाणी येणार म्हणून नळाकडे डोळे लावून बसलेल्या महिलांना हे समजताच त्यांची घाबरगुंडी उडाली. आता बिन पाण्याचं कस होणार..? आता पाणी कुठून आणायचं..? असा दंगा चालू झाला. महिन्यातून 1 दोनदा तरी असा प्रसंग शिरोळ मधील प्रत्येक भागात येतोच. दोन दोन -  तीन तीन दिवस पाणी येत नाही. असंच कित्येक वर्षांपासून चालू आहे. 


याबाबत नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात फोन केल्यावर समजलं, शिरोळ गावाला जिथून पाणी उपसा केला आहे, त्या घालवाड मध्ये लाईट गेली होती त्यामुळे टाकी भरली नाही. त्यामुळे आज पाणी येणार नाही. यासाठी महावितरणच्या शिरटी सब स्टेशन ला फोन केल्यावर समजलं, होय काल रात्री फक्त 25 मिनिटं लाईट गेली होती. 


धक्कादायक म्हणजे, घालवाड मध्ये 25 मिनिटं लाईट गेल्यावर शिरोळ मधील जवळपास 20 भागात पाणी आज सोडता आलेले नाही. एका भागात कमीत कामी 300 नागरिक जरी धरले तरी, आज जवळपास 6000 नागरिकांना एक दिवस आड जे पाणी येणार होते ते देखील आलेले नाही. गंभीर आहे की नाही...? थोडा वेळ लाईट गेल्यावर एवढ्या लोकांना जर पाणी जात नसेल तर त्याठिकाणी 24 तास लाईट चालू राहील अशी व्यवस्था का करण्यात आलेली नाही...?नगरपरिषद मध्ये लाईट गेली तर लगेच जनरेटर वापरला जात असेल तर नागरिकांच्या साठी 24 तास लाईट का उपलब्ध केली जात नाही?नागरिकांचा कोणाला विचार आहे काय नाही..? सत्ता आली की प्रत्येकाला आप आपला ठेकेदार पाहिजे. पाणीपुरवठा योजनेचं काय कां होईना.

 

"आम्ही सत्तेत आलो तर शिरोळच्या नागरिकांना रोज आणि शुद्ध पाणी मिळणार" हे वाक्य शिरोळ मधील प्रत्येक गट प्रत्येक निवडणुकीत वर्षानुवर्षे सांगत आला आहे. आत्ता चालू असलेली पाणी पुरवठा योजना, म्हणजे आत्ता शिरोळ गावाला पाणी येते ती योजना ही दररोज 40 लाख लिटर ची असून, हलक्या दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे त्याची कार्यक्षमता कामी झाली असून, सध्या 15 ते 20 लाख लिटरचं पाणी सध्या उपलब्ध होतं आहे. 


आणि आत्ता नवीन मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना ही देखील 40 लाख लिटरची असून, त्यामध्ये देखील खालच्या दर्जाच्या पाईप आणि चुकीचं कामं होतं असल्याचा आरोप वारंवार होतं असून, दोन गटाच्या वादात गेले वर्षभर कामं बंद पाडले आहे. ते कामं चालू होणार कधी..? ठेकेदार हाच राहणार काय बदलणार..? काम पूर्ण झालं तरी दररोज पाणी येणार का याबद्दल असे अनेक प्रश्न अजून नागरिकांच्या मनात आहेत. आपली जबाबदारी समजून राजकर्त्यांनी फक्त मुबलक वेळेवर व शुद्ध पाणी नागरिकांना द्यावे एवढी माफक अपेक्षा नागरिकांची आहे.



नवीन 26 कोटींची नळ पाणी पुरवठा योजनेचे काम दोन गटांच्या भांडणात गेले वर्षभर बंद आहे. नवीन योजनेतील पाण्याची लाईन जी नदीवरून फिल्टर हाऊस पर्यंत आणली आहे ती 25 ठिकाणी वळवून आणली आहे. त्यामुळे फिल्टर हाऊसला कमी पाणी येऊन तीही योजना शिरोळ ला दररोज पाणी देण्यासाठी पुरेशी ठरणार नसल्यामुळे, दररोज पाण्यासाठी गावाला आणखी 15 वर्ष तरी वाट पहावी लागणार आहे. आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी या त्रुटी कडे लक्ष देऊन शिरोळ गावाला दररोज पाणी कसे देता येईल हे पहावे.

              - कृष्णा देशमुख 

                 सामाजिक कार्यकर्ते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने