नाहीतर... इचलकरंजीचा पाणीपुरवठा बुधवारी रोखणार : धनाजी चुडमुंगे ; कुरुंदवाड येथे ठिय्या आंदोलन सुरु


लगाम न्यूज नेटवर्क 

कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने आजपासून कुरुंदवाड येथील नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. 1 व 2 जून रोजी ठिय्या आंदोलन आणि त्यानंतर देखील तोडगा न निघाल्यास  बुधवारी 3 जून रोजी इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिला आहे.




यावर प्रशासकीय स्तरावर हालचाली गतिमान झाल्याचे दिसून येत आहे, मंगळवारी यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाऊ शकतो,  आंदोलकांच्याकडून प्रोसेस चे केमिकल युक्त उग्र वासाचे पाणी पंचगंगा नदीत येता कामा नये, या प्रमुख मुद्द्यावर आंदोलन सुरु आहे. गेल्या कित्येक वर्षात अनेक आंदोलने याविषयावर झाली, परंतू प्रोसेस बंद करणे कोणालाही शक्य झाले नव्हते. ते कामं आंदोलन अंकुश संघटनेने करून दाखविले आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातून आंदोलन अंकुश संघटनेला मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा आहे. 



अंकुश संघटनेने अनेक वेळा निवेदने दिली, याविषयावर अनेक बैठका देखील झाल्या. परंतू प्रदूषित पंचगंगा नदीत मिसळणे अजून पूर्णपणे बंद झालेले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ठिय्या आंदोलन आणि नंतर इचलकरंजी चा कुरुंदवाड - मजरेवाडी मधून गेलेला पाणीपरवठा रोखणे असे आंदोलन पुकारण्यात आलेले होते. ठिय्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शिरोळ तालुक्यातील अनेक नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवीला.



यावेळी धनाजी चुडमुंगे म्हणाले, जर प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष करून वेळकाढूपणा केल्यास बुधवारी इचलकरंजी शहराला होणारा पाणीपुरवठा आमची इछया नसताना देखील रोखण्याची तीव्र  भूमिका घेतली जाईल. हे इतिहासातील मोठे आंदोलन असेल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील. प्रोसेस कंपन्यांच्या प्रदूषित पाण्यामुळे आमच्या तालुक्यात कॅन्सर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता आम्ही थांबणार नाही. आम्ही प्रोसेस बंद करा, कधीच म्हंटले नाही. फक्त ते पाणी पंचगंगा नदीत नको. त्यांनी त्यांच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्यांनी व्यवस्था केली नाही, प्रदूषित पाणी नदीत आले..  तर मात्र आमचा नाईलाज होईल.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने