शिरोळ : पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रशासन,प्रोसेस उद्योग आणि आंदोलकांमध्ये तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आज शुक्रवार दिनांक 5 जून रोजी झालेल्या स्थळ पाहणी वेळी काही प्रोसेस मालकांनी आणलेल्या गुंडांकडून आंदोलकांना दादागिरी करण्यात आल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील यांनी केला आहे. भविष्यात अशा प्रकारची गुंडगिरी आणि दादागिरी पुन्हा झाल्यास इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा न सांगता रोखण्याचा इशाराही त्यांनी दिला.
काल (४ जून) रोजी प्रांत कार्यालयात प्रशासन, आमदार राहुल आवाडे , प्रोसेस उद्योग मालक आणि आंदोलनकर्ते यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत प्रोसेस उद्योगांचे सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्ध केलेल्या १०६ एकर जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज प्रशासनाचे अधिकारी, प्रोसेस उद्योग मालक आणि आंदोलनकर्ते संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते.
मात्र, पाहणीदरम्यान काही प्रोसेस मालकांनी बाहेरून आणलेल्या गुंडांकरवी आंदोलकांशी अरेरावी करत दादागिरी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या गाडीची चारही चाके पंक्चर करण्यात आली. तालुका अध्यक्ष नागेश काळे यांची गाडी पाडून नुकसान करण्यात आले. पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शिरोळ तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.
यावेळी दिपक पाटील म्हणाले, "पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर आम्ही सातत्याने लढा देत आहोत. प्रशासनासोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असताना काही उद्योग मालकांकडून गुंडांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो सहन केला जाणार नाही. भविष्यात पुन्हा अशा प्रकारची दादागिरी झाल्यास इचलकरंजीचा पाणीपुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता रोखण्यात येईल."
अश्याप्रकारे सरकारी कामात अडथळा आणला गेल्यामुळे, इचलकरंजी चे तहसीलदार श्री. खिलारी यांनी शेत पाहणी करण्याचे पुढील काम तात्काळ थांबविले व प्रोसेस मालकांच्या अश्या कृत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
आज प्रोसेस मालकांनी त्यांचे सांडपाणी सोडण्यासाठी उपलब्ध केलेली 106 एकर जमीन बघण्यासाठी गेलो असता, प्रोसेस मालकांनी सांगितलेल्या 3 एकर जमीन पाहणीत फक्त 19 गुंठे जमीन निघाली. त्यामुळे आपला डाव फसणार हे लक्ष्यात आल्यावर त्यांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. पण अश्या गुंडगिरीने घाबरणारी आम्ही लोक नाही. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय सोडणार नाही.
धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश संघटना

टिप्पणी पोस्ट करा