"प्रदूषण मंडळाच्या नाकार्तेपणामुळे आज या आंदोलनाची वेळ : जिल्हाधिकारी" ; जिल्हाधिकारी कार्यालयातच आंदोलक आणि प्रोसेस मालक, कामगारांच्यात जोरदार वादावादी

पंचगंगा प्रदूषणाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना झापलं... पाणी सोडण्यासाठी जेवढी शेती उपलब्ध तेवढा वेळचं प्रोसेस चालू...




लगाम न्यूज नेटवर्क : 


कोल्हापूर : गेल्या 2-3 महिन्यांपासून पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा अगदी जोरदार सुरु असून, आंदोलन अंकुश संघटनेच्या प्रामाणिक आणि चिकाटीच्या लढ्यामुळे हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आहे. या आंदोलनामुळे इचलकरंजीच्या प्रोसेस कंपन्या, त्यांचे केमिकल युक्त पाणी आणि काळा ओढा हे विषय शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील नागरिकांच्या घराघरात पोहचले आहेत. 


मागील आठवड्यात कुरुंदवाड येथे इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्यासाठी झालेल्या आंदोलनात इचलकरंजी प्रांत यांनी जमीनीचा फेर सर्व्हे करणे आणि 25 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलेले होते.


त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ठीक 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी कोल्हापूर, इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, इचलकरंजी प्रांत, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, प्रोसेस कंपन्यांचे मालक व आंदोलक उपस्थित होते.





जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोसेस कंपन्यांचे पाणी सोडण्यासाठी उपलब्ध शेतीचा आढावा घेतला. प्रोसेस कंपन्यांनी सांगितलेल्या 106 एकर जमिनीपैकी 94 एकरांचे करार उपलब्ध होते. त्यापैकी प्रत्यक्ष फक्त 53 एकर जमीन पाणी सोडन्यायोग्य असल्याचा अहवाल प्रदूषण मंडळाने यावेळी सादर केला. त्यामुळे 53 एकर जमिनीला जेवढे पाणी लागते ( सरासरी 50 एकरसाठी 1 एम.एल.डी. ) तेवढेच प्रोसेस चालू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. 


आंदोलकांच्या बाजूने धनाजी चुडमुंगे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.  यावेळी आंदोलक व प्रोसेस मालक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. बैठक झाल्यानंतर देखील प्रोसेस कामगार व आंदोलकांच्यात वादावादी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातच झालेल्या या वादावादी मुळे प्रशासन हादरून गेले. "आमचा जीव गेला तरीही पंचगंगा शुद्ध केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही.", असे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यावेळी म्हणाले.  




"प्रदूषण मंडळाला तुकाराम मुंढें सारख्या अधिकाऱ्याची नितांत गरज"  : 

वास्तविक पाहता प्रदूषण करणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करणे हे मुख्य काम प्रदूषण मंडळाचे असताना, यांच्या  विभागाचे मुख्य अधिकारी श्री.घरक कधी कार्यालयातून बाहेर येत नाहीत. लोकप्रतिनिधिंसह कोणीही फोन केला तरी फोन उचलत नाहीत. पंचगंगा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आंदोलकांनी त्रुटी दाखवून दिल्या तरीही कारवाई करण्याची यांची मानसिकता नाही. उलटपक्षी प्रदूषण करणाऱ्यांना साथ देण्याचे काम हे अधिकारी करताना दिसत आहेत. आपला आर्थिक लाभ करून घेण्यात हे अधिकारी व्यस्त असल्याची चर्चा सर्वत्र आहे. त्यामुळे तुकाराम मुंढें सारख्या खमक्या अधिकाऱ्याची प्रदूषण मंडळाला सध्या नितांत गरज आहे. 

 




यावेळी एका प्रोसेस मालकाने शिरोळ तालुक्यातील फळ भाज्यांवर केल्या जाणाऱ्या फवारणीचा उल्लेख कॅन्सर ग्रस्तांशी केल्यावर आंदोलन अंकुशचे  राकेश जगदाळे चांगलेच संतापले. समोर उपस्थित असलेले इचलकरंजीचे आमदार  राहूल आवाडे यांना तुम्ही "शिरोळ तालुक्यातील फळ भाज्यांमुळे कॅन्सर होतोय या मताशी सहमत असाल,तर आम्हाला शिरोळ तालुक्याला तस सांगायला बर " असा थेट सवाल केला.  


 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने