शिरोळचे आमदार यड्रावकर पंचगंगा प्रदूषणावर कधी बोलणार...? शिरोळ तालुक्यातील नागरिकांचा संतप्त सवाल

इचलकरंजीचे आमदार प्रोसेस वाल्यांच्या बाजूने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित 

शिरोळच्या आमदारांना पंचगंगा प्रदूषण शिरोळ तालुक्याचा गंभीर प्रश्न वाटत नाही काय...? 

आंदोलकांना मारहाण होण्याची वाट बघणार काय ..?




लगाम न्यूज नेटवर्क 

शिरोळ : पंचगंगा नदी प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यात कॅन्सरग्रस्तांचे प्रमाण वाढले आहे. शेती व शेतमालावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन अंकुश संघटना शिरोळ तालुक्यातील मूठभर जागरूक नागरिकांना सोबत घेवून,  प्रदूषणासाठी जबाबदार असलेला एक महत्त्वाचा घटक म्हणून इचलकरंजीच्या प्रोसेस कंपन्यांशी एकाकी लढा देत आहे.



या लढ्यात कित्येकदा प्रशासकीय स्तरावर बैठका झाल्या. प्रोसेस कंपन्यांना आंदोलकांनी गुडघे टेकायला भाग पाडले. या आंदोलनामुळे पंचगंगेत मिसळणारे प्रदूषित पानी नक्कीच कमी झाले आहे. आंदोलन अंकुश संघटना नदीत मिसळणारे हे प्रदूषित पाणी पूर्णपणे बंद करण्यावर ठाम आहे. त्यांना शिरोळ तालुक्यातील नागरिकांचा देखील वाढता पाठिंबा दिसत आहे.



परंतु शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्यातील लोकांच्या जीवन मरणाच्या या गंभीर प्रश्नावर अजून देखील सहभाग घेतलेला नाही. तहसीलदार कार्यालय शिरोळ येथे पंचगंगा प्रदूषणाबाबत झालेल्या एका बैठकीत ते प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहिले. परंतू अजूनदेखील प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत किंवा शिरोळ तालुक्यातील नागरिकांना पंचगंगा प्रदूषणाबाबत होणाऱ्या आजारांवर आज तागायत एक ब्र शब्द काढलेला नाही. 



काल 25 जून रोजी या विषयावर झालेल्या बैठकीत इचलकरंजीचे आमदार राहूल आवाडे हे अधिवेशन सुरू असताना देखील प्रोसेस कंपन्यांच्या बाजूने उपस्थित होते. ( त्यांनी प्रत्यक्ष तसे आपल्या बोलण्यातून जाणवू दिले नाही. ) मग शिरोळ चे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आंदोलकांच्या बाजूने राहण्यात काय हरकत आहे. आंदोलकांच्या मते यड्रावकर यांनी प्रदूषणमुक्तीचे सर्व श्रेय घ्यावे, खर पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या या लढ्यात नागरिकांसोबत राहावे. 



आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील अश्या प्रकारच्या गंभीर समस्येवर देखील कानाडोळा केल्यामुळे तालुक्यातील जनता मात्र त्यांच्यावर चांगलीच नाराज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने