पंचंगंगा प्रदूषणाच्या मुद्द्यावर तहसीलदार कार्यालयात बैठक संपन्न
शिरोळ : उद्या बुधवार दिनांक 3 जून रोजी आंदोलन अंकुश संघटने कडून प्रोसेसचे पाणी नदीत मिसळणे बंद न झाल्यास इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3 वाजता तहसीलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ऑनलाईन पद्धतीने, तर तहसीलदार अनिलकुमार हेळकर, प्रदूषण मंडळाचे विभागीय अधिकारी निखिल घरत, क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी बाजीराव कांबळे, एमआयडीसीचे अधिकारी व आंदोलक मोठ्या प्रमाणात कार्यालयात उपस्थित होते.
प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रोसेस कंपन्यांनी 106 एकर जमीन पाणी सोडण्यासाठी उपलब्ध केल्याचे सांगितले. त्याला उत्तर देताना आंदोलकांनी प्रदूषण मंडळाचे अधिकारी खोटे बोलत असल्याचे सांगत, यापूर्वी प्रोसेस कंपन्यांनी 300 एकर जमीन पाणी सोडण्यासाठी असल्याचे सांगितले होते, परंतु प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी केली असता ते क्षेत्र 4 एकर भरले. त्यामुळे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास नाही असे आंदोलकांनी ठाम सांगितले.
खासदार व आमदार महोदयांनी संपूर्ण विषय ऐकून घेऊन, प्रोसेस कंपन्यांनी दिलेली 106 एकर जमीन पडताळणी होत नाही, तोपर्यंत प्रोसेस कंपन्या बंद ठेवण्याचा प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला.
यावेळी प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांच्यावर आंदोलकांनी प्रश्नांचा भडीमार करत, एवढी वर्षे तुमची जबाबदारी असताना तुम्ही काय काम केला..? प्रोसेस वाल्यांकडून तुम्ही पैसे घेतला आहात. आता प्रोसेस बंद होईपर्यंत तुमची सुटका नाही म्हणत, तहसीलदार कार्यालयातच त्यांना संध्याकाळी 7 पर्यंत कोंडून घातले होते. यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकरांसह, आंदोलक तहसीलदारांच्या दालनात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा