(लगाम न्यूज नेटवर्क )
कुरुंदवाड प्रतिनिधी : नंदकूमार सुतार सर
हेरवाड ता. शिरोळ येथील हेरवाड हायस्कूलमधील कथित विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील फरार असलेला संशयित शिक्षक अजित भूपाल दिवटे याला अखेर कुरुंदवाड पोलिसांनी सापळा रचून पंढरपूर येथून ताब्यात घेतले आहे. 21 जुलै पासून कुरूंदवाड पोलिसांना आरोपी शिक्षकाला पकडण्यात अपयश आलेले होते. पोलिसांच्या तपासावर देखील काही नागरिकांनी संशय व्यक्त केलेला होता. अखेर सामाजिक सर्व स्तरातून वाढलेल्या दबावामुळे कुरूंदवाड पोलिसांनी हालचाली करत, आज आरोपीला अटक केली. शुक्रवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेरवाड ता. शिरोळ येथील हेरवाड हायस्कूल हेरवाडमधील झालेल्या कथित विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी शिक्षक अजित दिवटे याच्यावर कुरूंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या अटकेची आरपीआय, लोक जनशक्ती पार्टी, पुरोगामी संघर्ष समिती,गावकरी विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून केली जात होती. तपासातील दिरंगाईवरून पोलिस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवून सापळा रचून त्याला पंढरपूर येथून ताब्यात घेतले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने,पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानदेव सानप आणि अविनाश भोसले यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे पंढरपूर येथे कारवाई करत संशयित शिक्षक अजित दिवटे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारवाईची पूर्णपणे गोपनीयता राखली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत या प्रकरणातील पुढील तपासाला वेग दिला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीची पोलीस कोठडी मिळते का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा