हेरवाड हायस्कूलच्या शिक्षकाने आपल्याच शाळेच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग ; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल





लगाम न्यूज नेटवर्क 

कुरुंदवाड प्रतिनिधी  : नंदकूमार सुतार सर 

शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित हेरवाड हायस्कूल, हेरवाड मधील एका शिक्षकाविरुद्ध अल्पवयीन विद्यार्थिनीचा कथित विनयभंग केल्याप्रकरणी कुरूंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, हेरवाड येथील रहिवासी महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीच्यावतीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, २३ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास हेरवाड हायस्कूलमधील संगणक कक्षात हा कथित प्रकार घडल्याचा आरोप आहे.


फिर्यादीनुसार, फिर्यादी विद्यार्थिनीच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने,फिर्यादी मुलगी व तिची मैत्रीण शाळेतील शिक्षकांना चॉकलेट वाटप करत होत्या. त्यावेळी संबंधित विद्यार्थिनी संगणक कक्षात गेल्या असता, आरोपी शिक्षकाने फिर्यादी मुलीला आत थांबवून घेतले व तिच्या इच्छेविरुद्ध अंगाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरली असून, तिने ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.


या प्रकरणी पोलिसांनी हेरवाड हायस्कूलमधील शिक्षक अजित दिवटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ मधील कलम ८, ९ आणि १० अन्वये गुन्हा नोंदविला आहे.


या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील करीत असून, फिर्याद नोंदविण्याचे काम पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे यांनी केले आहे. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने