उद्यापासून आमरण उपोषण ; लोडशेडींग च्या विरोधात आंदोलन अंकुश दानोळीचा महावितरणला इशारा



लगाम न्यूज नेटवर्क 

दानोळी प्रतिनिधी : दानोळी गावातील मळा भागात गेल्या अनेक दिवसांपासून दररोज संध्याकाळी होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, हा प्रकार तात्काळ बंद न केल्यास उद्या (दि. १८ जून) सायंकाळी ५ वाजल्यापासून महावितरणच्या दानोळी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल,  असा इशारा आंदोलन अंकुश, दानोळी यांच्या वतीने महावितरणला देण्यात आला आहे.


याबाबत सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, दानोळी यांना निवेदन देण्यात आले असून, नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.




निवेदनात म्हटले आहे की, दानोळी गावातील मळा भागात दररोज संध्याकाळी सुमारे 7 वाजल्यापासून रात्री 10:30  वाजेपर्यंत नियमितपणे वीजपुरवठा खंडित केला जात आहे. हा प्रकार रोजचाच बनला असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.





याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, "वरून लोडशेडिंगचे आदेश असल्यामुळे वीजपुरवठा बंद केला जात आहे," असे उत्तर दिले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, कोणत्या आदेशानुसार आणि कोणत्या निकषावर दानोळीतील नागरिकांना रोजच्या रोज अंधारात ठेवले जात आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


या नियमित वीज खंडितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा अडथळा निर्माण होत असून, वृद्ध नागरिकांना उकाड्यामुळे आणि अंधारामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तसेच घरगुती कामकाज, पाणीपुरवठा, लहान उद्योग-व्यवसाय आणि दैनंदिन जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे.


नागरिकांच्या वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने हा प्रश्न तातडीने सोडवून दररोज होणारे लोडशेडिंग तत्काळ बंद करावे, अशी मागणी आंदोलन अंकुशच्या वतीने करण्यात आली आहे.


अन्यथा, उद्या (दि. १८ जून) सायंकाळी ५ वाजल्यापासून महावितरणच्या दानोळी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.


आंदोलन अंकुशच्या या इशाऱ्यानंतर महावितरण प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे दानोळी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. निवेदनावर उदय होगले, सुनील होगले, प्रमोद बाबर, दत्तात्रय जगदाळे, बाळू भोगावे, धनाजी केकले यांच्या सह्या आहेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने