आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे तक्रार करणार : आंदोलन अंकुशचे अक्षय पाटील यांचा इशारा
लगाम न्यूज नेटवर्क
शिरोळ: येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, गरीब रुग्णांना मूलभूत सुविधांसाठीही वणवण करावी लागत आहे. रुग्णालयामध्ये रुग्णांना जेवण आणि पिण्याच्या पाण्याची देखील सोय उपलब्ध नाही. या रुग्णालयावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, असा थेट आरोप 'आंदोलन अंकुश'चे शिरोळ शहराध्यक्ष श्री.अक्षय पाटील यांनी केला आहे. या गंभीर परिस्थितीबाबत थेट कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे अधिकृत तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना हक्काचे उपचार मिळावेत, या उद्देशाने शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र, सध्या या रुग्णालयालाच अवकळा आली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना जेवण मिळत नाही. तसेच पिण्याच्या शुद्ध पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून पाणी विकत आणावे लागत आहे. रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे सामान्य रुग्णांना नाहक मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेचा अभाव, कर्मचाऱ्यांची अनियमितता आणि अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णालयाची दैनंदिन घडी विस्कटली आहे. स्थानिक पातळीवर वारंवार सांगूनही परिस्थिती सुधारत नसल्याने, या रुग्णालयाच्या प्रशासनावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, हे स्पष्ट होत आहे.
याबाबत बोलताना 'आंदोलन अंकुश'चे शिरोळ शहराध्यक्ष अक्षय पाटील म्हणाले, "ग्रामीण रुग्णालयात येणारा रुग्ण हा आधीच आजाराने खचलेला असतो. त्यात त्याला इथे जेवण आणि पाणीही मिळत नसेल, तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकते.. ? रुग्णालयाच्या नियंत्रक डॉ. चोले यांच्याशी बोलन्याचा प्रयत्न केला असता, त्या दीड महिन्यांच्या सुट्टीवर आहेत असे समजले. त्यांच्याशी फोन वरुन बोललो असता, जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराने दर परवडत नसल्याने जेवण देणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे या रुग्णालयाचा कारभार पूर्णपणे रामभरोसे चालला असल्याचे चित्र आहे. गोरगरिबांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ आम्ही खपवून घेणार नाही. शिरोळ ग्रामीण रुग्णालयाची ही दुरावस्था सुधारण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी आम्ही राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे पुराव्यांसह रीतसर तक्रार दाखल करणार आहोत." असेही अक्षय पाटील यावेळी म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा