उसाची रिकव्हरी काढणारी प्रयोगशाळा राज्यात आदर्शवत ठरेल, येत्या हंगामा पासून शेतकऱ्यांना उसाची खरी रिकव्हरी समजेल : धनाजी चुडमुंगे



लगाम न्यूज नेटवर्क 

दानोळी : राज्यातील प्रमुख पीक असणाऱ्या उसाची रिकव्हरी चेक करायची कोणतीही त्रयस्थ व्यवस्था सरकारने आत्ता पर्यंत का निर्माण केली नाही..?  हा प्रश्नच आहे. पण आंदोलन अंकुश संघटना ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधण्याचे काम करणारी संघटना आहे. शेतकऱ्यांच्या मदतीतून येत्या हंगामापूर्वी रिकव्हरी प्रयोगशाळा उभारली जाणार असून,  शेतकऱ्यांनी या प्रयोगाला पण आर्थिक मदत करून साथ द्यावी. असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी दानोळी येथे केले.


अंबाबाई मंदिर, दानोळी येथे काल (दिनांक 15 जुलै ) रोजीच्या निधी संकलन बैठकीत ते बोलत होते. शिरोळ येथील शेतकरी वजन काट्यावर संघटनेच्या पुढाकाराने उसाची रिकव्हरी काढणारी प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. या प्रयोगशाळेसाठी गावागावातुन निधी जमा केला जात आहे. त्या अनुषंगाने दानोळी येथे शेतकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले की,


2012 पासून कारखान्यांच्या सरासरी रिकव्हरी वर उसाचा दर दिला जात आहे. कारखाने जी रिकव्हरी दाखवतात, ती खरी का खोटी याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका आहेत. पण शेतकऱ्यांच्या मनातील हा संशय दूर व्हावा, यासाठी शासन काहीच करत नसले तरी आम्ही शेतकरी संघटना म्हणून त्रयस्थ अशी आधुनिक रिकव्हरी प्रयोगशाळा उभा करून उसाची खरी रिकव्हरी किती येते हे समोर आणणार आहोत. या प्रयोगशाळेला तालुक्यातील प्रत्येक गावातून निधी उभारला जाणार असून, येत्या हंगामापूर्वी ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी शेवटी सांगितले.


पहिल्याच दिवशी 10,000 रुपये झाले जमा: 

दानोळी येथील अंबाबाई मंदिरात निधी संकलणाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी प्रयोगशाळा उभारणी साठी म्हणून 10,000 रुपये त्याच ठिकाणी आर्थिक मदत दिली. तर दानोळी गावातील दानशूर व्यक्ती, शेतकरी, व्यापारी यांच्याकडून मोठा निधी संघटनेच्या या कामाला दिला जाईल. असे बबलू दळवी, रुपये भोसले यांनी यावेळी जाहीर केले.


या बैठकीला बबलू दळवी, उदय होगले, दत्तात्रय जगदाळे, बंटी माळी, धन्यकुमार भोसले, विजय दळवी, रुपेश भोसले, प्रमोद बाबर, बंडू होगले, बाळासाहेब भोगावे, सुनील बाबर, पुरषोत्तम कदम, राजेंद्र केकले, अनिल गावडे, जग्गनाथ भुसान्ना, सुहास होगले, राजेंद्र भुसान्ना, संजय आळतेकर व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने