सैनिक टाकळी प्रस्तावित MIDC ची प्रक्रिया स्थगित ; सैनिकांचा आम्हाला अभिमान ; सैनिकांना अभिप्रेत असलेला विकास करू : उदय सामंत

 सैनिक टाकळी MIDC संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर बैठक संपन्न;

 गायरान जमीन, शिल्लक क्षेत्रफळ आणि ग्रामसभेच्या ठरावाची चौकशी करण्याचे आदेश 





लगाम न्यूज नेटवर्क 

सैनिक टाकळी : सैनिक टाकळी गावातील प्रस्तावित MIDC प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत आंदोलकांनी MIDC प्रकल्पासाठी गायरान जमिनीचा वापर, गावातील एकूण उपलब्ध गायरान क्षेत्र आणि MIDC झाल्यानंतर गावासाठी किती गायरान जमीन शिल्लक राहणार, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्याची सविस्तर चौकशी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांचेकडून देण्यात आलेले आहेत.




बैठकीत सैनिक टाकळी गावचे माजी सैनिक व आंदोलकांनी   सैनिक टाकळी गावाने आजतगायत 1 गुंठाही गायरान जमीन अतिक्रमित केली नसल्याचे सांगत, गावाची सैनिक परंपरा मंत्र्यांना सांगून गावाच्या गायरान जमिनीत सैनिक स्कूल, केंद्रीय शाळा, क्रिडांगण, माजी सैनिक वसाहत उभी करण्याची मागणी केली. तसेच ज्या ग्रामसभेच्या ठरावाच्या आधारे शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी गावावर एमआयडीसी लादण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ज्या ठरवाच्या आधारे सदर एमआयडीसीची प्रक्रिया पुढे गेली आहे. तो ठरावच अवैध असल्याचे आंदोलकांनी सांगितले. 


गायरान जागेची चौकशी : MIDC प्रक्रिया स्थगित 

    माजी सैनिकांच्या मागणीची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित यंत्रणांकडून संपूर्ण माहिती तपासून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. महसूल अभिलेख, जमिनीची मालकी, गायरान क्षेत्राची नोंद, MIDC साठी प्रस्तावित क्षेत्र, MIDC झालेनंतर शिल्लक क्षेत्र यांचा तुलनात्मक अभ्यास करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याच्या दृष्टीने चौकशी करण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले आहेत. महत्वाचे म्हणजे संपूर्ण चौकशी होईपर्यंत MIDC ची संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिलेले आहेत. 


ग्रामसभेच्या ठरावावरही प्रश्नचिन्ह 

या बैठकीतील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रस्तावित MIDC संदर्भात दाखविण्यात आलेल्या ग्रामसभेच्या ठरावाचा...? याबाबत देखील झालेल्या ग्रामसभेची सखोल चौकशी करण्याचे आदेश उद्योगमंत्री सामंत यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले आहे. 


त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा आम्हाला अभिमान असून, माजी सैनिकांची मागणी असलेल्या सर्व सुविधा सैनिक टाकळी गावात उभे करण्याचे आश्वासन दिले आहे. 


चौकशीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष

सैनिक टाकळीतील MIDC प्रश्नावर आता प्रशासनाच्या चौकशीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. गायरान जमिनीचे एकूण क्षेत्रफळ, MIDC साठी प्रस्तावित जमीन, प्रकल्पानंतर शिल्लक राहणारे क्षेत्र आणि ग्रामसभेच्या ठरावाची सत्याता या सर्व मुद्द्यांवर अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.


माजी सैनिक आणि गावकऱ्यांच्या लढ्याला यश 

उद्योगमंत्र्यांसमोर झालेल्या बैठकीमुळे सैनिक टाकळी MIDC विरोधातील आंदोलनाला आता नवी दिशा मिळाल्याचे चित्र आहे. गायरान जमिनीचा नेमका हिशोब आणि ग्रामसभेच्या ठरावाची सत्यता या दोन प्रमुख मुद्द्यांवर चौकशीचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिल्याने आता जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या चौकशीकडे सैनिक टाकळी परिसरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


MIDC ची अत्यंत गतीने चालू असलेली प्रक्रिया देखील स्थगित झाल्यामुळे  या  आंदोलनाला माजी सैनिक व सैनिक टाकळीच्या नागरिकांना यश येताना दिसत असून,  जर चौकशी चालू असताना देखील MIDC ची प्रक्रिया पुढे गेल्यास, पुन्हा उग्र स्वरूपातील आंदोलनाचा इशारा सैनिक टाकळीकरांनी दिला आहे.


यावेळी आंदोलन  अंकुंश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, टाकळी जल जमीन जीवन बचाव कृती समिती,  माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी कॅप्टन प्रकाश खोत, लेफ्टनंट विजय गायकवाड,अमर पाटील वायुसैनिक अमर पाटील, माजी सरपंच सौ हर्षदा पाटील, विनोद पाटील, संतोष गायकवाड,  विजय पाटील, श्रीधर भोसले, नवनाथ पाटील, विजय पाटील, निवेदिता वासमकर, प्रदीप पाटील, अमर वासमकर, किरण माने उपस्थित होते. 


या बैठकीला शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणे अपेक्षित होते, आमदार साहेब मंत्रालयात देखील उपस्थित होते. परंतु या अत्यंत महत्वाच्या बैठकीला हजर राहिले नसल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलेले दिसत आहे.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने