उद्या आमदार यड्रावकरांच्या कार्यालयावर हजारोंच्या संख्येने पोहचणार : दिपक पाटील




लगाम न्यूज नेटवर्क 

शिरोळ : सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या स्वरूपात आंदोलन सुरू आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यकर्त्यांकडून माजी सैनिक व आंदोलकांना बैठकीला बोलवून मारहाण करण्यात आली. यानंतर त्या दिवसापासूनच सैनिक टाकळी चे सैनिक व शेतकरी आंदोलन जयसिंगपूरच्या विक्रम सिंह क्रीडांगणावर ठिय्या मांडून बसले आहेत. त्याचबरोबर उद्या 15 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक बारा वाजेपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, "एमआयडीसी करायचा तुमचा एवढा अट्टाहास का..?" हे विचारण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर पुन्हा जाणार असल्याचे दीपक पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर उद्या आमच्या सोबत समविचारी पक्ष, संघटना, माजी सैनिक, शेतकरी व सैनिक टाकळी परिसरातील आसपासच्या गावातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत असेही ते म्हणाले.



जयसिंगपूर शहरासह तालुक्याच्या गावागावात लाऊड स्पीकरच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. सैनिक टाकळीच्या प्रस्तावित एमआयडीसी विरोधात ग्रामस्थांनी काढलेल्या पायी मोर्चावेळी चर्चेच्या निमित्ताने बोलवून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यकर्त्यांकडून माजी सैनिकांना मारहाणीचा आरोप आंदोलकांनी केला आहे. याप्रकरणी आमदार यड्रावकरांवर प्रमुख आरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा, एमआयडीसी रद्द करण्याच्या मागणीसाठी शासन पातळीवर बैठक लावावी, तोपर्यंत एमआयडीसी ची प्रक्रिया रद्द करण्यात यावी, माजी सैनिकांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी. या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून ग्रामस्थांच्यावतीने नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह मैदानालगत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.



गेल्या सहा दिवसात शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविले आहे. ग्रामस्थांनी शनिवारी स्वातंत्र्यदिनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता तालुक्यातील समविचारी मंडळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयावर जमणार आहेत.

 


तहसीलदार कार्यालय, शिरोळ येथे आमदार यड्रावकर यांच्याकडून ध्वजवंदनास मज्जाव केला जाणार आहे. शिवाय दुपारी बारा वाजेपर्यंत या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून निर्णय द्यावा. अन्यथा दुपारी बारा वाजता पुन्हा आमदार यड्रावकर यांच्या जयसिंगपूर येथील कार्यालयावर आंदोलक धडक मारणार आहेत.



आंदोलनात सैनिक टाकळी ग्रामस्थांबरोबर आंदोलन अंकुश, भारतीय जनता पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), जय शिवराय संघटना, धनंजय महाडिक युवाशक्ती, लाल बावटा युनियन यांच्याबरोबरच जयसिंगपूरमधील आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार आहेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने