लगाम न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, बाजारपेठा तसेच गर्दीच्या ठिकाणी निर्भया पथकाकडून भेटी देऊन मुली व महिलांना स्वसंरक्षण, छेडछाड, महिला अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांपासून सावध राहुन चुकीचा प्रकार घडल्यास तो लपवून न ठेवता पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तातडीने माहिती द्यावी. असे आवाहन निर्भया पथकाच्या महिला कॉन्स्टेबल स्वाती जाधव यांनी केले. येथील साने गुरुजी विद्यालयात निर्भया पथकाच्यावतीने इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थी,विद्यार्थिनींना समुपदेशन करताना त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक किरण पाटील होते.
त्यापुढे म्हणाले की, शहरातील महिला व मुलींना सुरक्षित वातावरण मिळावे, छेडछाड व महिलांविरुद्ध होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी पोलिसांकडून निर्भया पथकाच्या माध्यमातून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. निर्भया पथकाचे प्रमुख उद्दिष्ट महिलांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे तसेच अडचणीच्या प्रसंगी तातडीने पोलिसांची मदत मिळवून देता येते.
जिल्ह्यात २०१६ साली सहा निर्भया पथकाची स्थापना केली आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, बस स्टॅन्डमध्ये महिला व मुलींचा वावर असतो. तेथे निर्भया पथकाच्यावतीने समुपदेशन केले जाते. ज्या मुलांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असते ती मुले वाया जात नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध असून, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले आहे. मुलींनी आयुष्यात ध्येय निश्चित ठेवून स्वसंरक्षणासाठी कराटे, बॉक्सिंग व मैदानी खेळ खेळले पाहिजेत व स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. तर अनोळखी मुलांशी संवाद साधू नये असे आवाहन स्वाती जाधव यांनी केले.
यावेळी बोलताना पोलीस हेड कॉन्स्टेबल आसिफ शिराजभाई म्हणाले की,महिलांनी अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करू नये. संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करू नये आणि अडचणीच्या प्रसंगी पोलिसांशी संपर्क साधावा. महिला सुरक्षेबाबत जनजागृती वाढविण्यासाठी निर्भया पथकाचे उपक्रम सातत्याने सुरू आहेत. महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित या भावनेतून निर्भया पथकाच्या कार्याला नागरिकांनी सहकार्य करून कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. असे आवाहन शिराजभाई यांनी केले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक व पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक किरण पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी निर्मळे यांनी तर आभार पद्मजा पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक शरद तावदारे, सचिन गुदले, बाळकृष्ण फल्ले, विजय माळी, मेघमाला पाटील, विजय महाजन, अभिषेक सुमंत, दीपक चौगुले, शामराव गायकवाड यासह शिक्षक, शिक्षकेत कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा