टाकळीवाडीतील बैलगाडी शर्यतीत नियमांचे उल्लंघन ; गाडीवान, बैलमालक व मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी



लगाम न्यूज नेटवर्क 

शिरोळ : टाकळीवाडी येथे दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता झालेल्या बैलगाडी शर्यतीदरम्यान नियमांचे उल्लंघन करून बैलगाडीला मोटारसायकलच्या सहाय्याने ढकली लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकाराचे छायाचित्रे व इतर पुरावे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जमा करून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात निवेदन दिले असून, संबंधित गाडीवान, बैलमालक तसेच मोटारसायकलवरून ढकली लावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.




असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, टाकळीवाडी मैदानावर विनापरवाना बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या. शर्यतीदरम्यान असोसिएशनने निश्चित केलेल्या नियमांचे उल्लंघन करत एका बैलगाडीला मोटारसायकलच्या माध्यमातून ढकली लावण्यात आली. मैदानातील छायाचित्रे व उपलब्ध पुराव्यांची पाहणी केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणात गाडीवान मयुरेश बदामे (टाकळी), मोटारसायकलवरून ढकली लावल्याचा आरोप असलेला अमोल उगारे (टाकळी) तसेच संबंधित बैलमालकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 





या निवेदन देताना, कोल्हापूर असोसिएशनमधील अरुण पाटील-कळंबा, सचिन पाटील-कोल्हापूर, सुधीर खाडे-जयसिंगपूर, दिगंबर चव्हाण-हातकणंगले, अजय सावंत-शिरोळ, बंडा शिंदे-दानोळी, उत्तम मंडले-दानोळी, बंडा खिल्लारे-दानोळी, अशोक जंगम-औरवाड, संतोष पोमाजे-कुरुंदवाड, अमोल चिगरे-टाकळी, ऋषिकेश तासगावे- जांभळी, सचिन मोरे-जयसिंगपूर, बाळासो पाटील-टाकवडे, उत्तम पाटील-नागदेववाडी, शिवाजी पाटील-टाकळी व बाजीराव पाटील-टाकळी उपस्थित होते.


दरम्यान, नियमभंग करणाऱ्या संबंधितांवर असोसिएशननेही शिस्तभंगाची कारवाई केली आहे. सचिन खोत, अमोल हवालदार व संदीप पवार या गाडीवानांवर एक महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. तर यगारे ब्रदर्स, गोल्डन ऋषी, आशिष पाटील यड्राव, सचिन रेंदाळ, रणजित गायकवाड कोल्हापूर व निखिल वाळकुजे दानोळी यांच्या बैलांवर तीन महिन्यांची बंदी घालण्यात आल्याचे असोसिएशनने जाहीर केले आहे. तसेच सुखदेव चिगरे टाकळी व सचिन कोळेकर जयसिंगपूर या बैलमालकांवरही तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.


बैलगाडी शर्यतीत गैरप्रकार होऊ नयेत, स्पर्धेतील पारदर्शकता व सुरक्षितता कायम राहावी आणि असोसिएशनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या सदस्यांनी स्पष्ट केले. टाकळीवाडी येथील प्रकारामुळे बैलगाडी शर्यतींच्या आयोजनात नियमपालन आणि प्रशासनाच्या परवानगीचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने