शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
शिरोळ शहरात पावसाचा एक थेंब जरी पडला तरी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. नागरिकांच्या मते, पावसाची सुरुवात होताच महावितरणकडून वीजपुरवठा बंद केला जातो आणि तो पुन्हा सुरू होण्यासाठी किमान दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. या वारंवार होणाऱ्या खंडित विज पुरवठ्यामुळे शिरोळकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
विशेषतः सायंकाळच्या वेळेत पावसामुळे वीज गेल्यास घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच छोट्या व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. नागरिकांचा आरोप आहे की, महावितरणने वेळच्या वेळी आवश्यक ती दुरुस्ती आणि देखभाल केली नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. तसेच, तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क साधला असता योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचीही तक्रार आहे.
यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, “पावसामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित करावा लागतो,” असे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, नागरिकांनी या उत्तरावर नाराजी व्यक्त करत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच रात्री देखील कायमस्वरूपी वायरमन नेमवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा