लगाम न्यूज नेटवर्क :
पंचगंगा नदी पूर्णपणे दूषित झालेली असून, इचलकरंजी परिसरातील प्रोसेस मधून बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीचे पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वापरताना त्वचारोग होत आहेत, शेती प्रदूषित होत आहे आणि परिसरात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे . आता सध्या या केमिकल युक्त पाण्यामुळे नदीमध्ये मृत माशांचा खच देखील पडलेला आहे.
हे प्रदूषित पाणी नदीत सोडायचे तात्काळ थांबवा, अन्यथा 6 एप्रिल रोजी काळा ओढा बंद करायचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिलेला होता. त्याप्रमाणे आज दुपारी 12 वाजता शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांसह धनाजी चुडमुंगे यांनी काळ्या ओढ्यात येणारे पाणी माती मुरूम टाकून बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मातीची गाडी ओढ्यापर्यंत येऊ दिली नाही व आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. शिरोळचे प्रभारी तहसीलदार खिलारी साहेब यांनी घटनास्थळी भेट देत, प्रदूषित पाण्याची पाहणी केली व आंदोलकांना प्रांत कार्यालयात बैठकीचे निमंत्रण दिले.
तोडगा नाहीच...
प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी इचलकरंजी महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग, प्रोसेस कंपन्यांचे मालक व आंदोलक यांच्यात पुन्हा एकदा बैठक आयोजित केली. परंतू या बैठकीत देखील 15 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीप्रमाणेच प्रांतांनी अधिकाऱ्यांना व प्रोसेस मालकांना तेच तेच प्रश्न विचारले व सर्वांनी त्याच पद्धतीने उत्तरे दिली. तोडगा नाहीच.... महानगरपालिकेने त्यांच्या सांडपाण्यासाठी काहीही उपाययोजना न केल्याचे बैठकीत उघडकीस आले. प्रोसेस युनिट मालकांनी 4 दिवसात ओढ्यात येणारे सर्व पाणी बंद करणार व प्रोसेस करून शेतीला जास्तीत जास्त पाणी देत असल्याचे सांगितले.
यावर आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी 4 दिवस राहू दे 8 दिवस घ्या, खरं 8 दिवसानंतर प्रांतांनी आम्हाला ओढ्यात येणारे पाणी बंद करण्यासाठी बांध घालून द्यावा असे सांगितले. जर तुम्ही बांध घालून दिला नाही, तर आम्ही संपूर्ण शिरोळ तालुका बंद ठेवून प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
त्यामुळे आता येत्या 8 दिवसात प्रशासन किती गतिमान होणार आणि प्रांताधिकारी पंचगंगेत मिसळणारे प्रदूषित पाणी बंद करू शकणार का...? हे बघावे लागेल.


टिप्पणी पोस्ट करा