लगाम न्यूज नेटवर्क
शिरोळ प्रतिनिधी : शिरोळ शहरासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत करण्यात येणारी पाणीपुरवठा योजना ही सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. आत्ता सत्तेत आलेल्या यादव आघाडीने या योजनेतील कामाच्या त्रुटींबाबत बरेच दिवस आंदोलन देखील केलेले होते. त्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून या नवीन पाणी पुंरवठा योजनेच्या थांबलेल्या कामाचे पुढे काय करायचे हे ठरविण्यासाठी आज बुधवार दिनांक 08 जुलै रोजी नगरपरिषद शिरोळ येथे नागरिक,अधिकारी,सत्ताधारी व ठेकेदार यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
यावेळी नागरिकांनी सुचवलेल्या सूचनेस व हरकतीस अधीन राहून ठेकेदाराने काम करावे अशी एकमुखी मागणी पालिकेच्या बैठकीत करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने 25 ठिकाणी वळवत आणलेली मुख्य पाईपलाईन सरळ रेषेत पूर्ण करणे, तहसील कार्यालयनजीकची पाण्याची टाकी पुन्हा बाधणे, योजनेचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार बदलणे, पाईपलाईनसाठी दर्जेदार पाईप्स वापरणे, योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेने कर्ज न काढणे. यासह अनेक सूचना नागरिकांनी मांडल्या. यासंदर्भात निर्णय देण्यासाठी दोन दिवसाचा अवधी मिळावा अशी मागणी पाणी योजना ठेकेदारांकडून करण्यात आली आहे.
या बैठकीत शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी पाणी योजनेसंदर्भातील झालेल्या कामाचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या निर्देशाची माहिती देत नागरिकांच्या हरकतीचा विचार करून पाणी योजना पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहे. ही योजना करत असताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही प्रत्येक नागरिकांची मत जाणून घेतली जातील. या योजनेत एक रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही. योजना पूर्ण करण्यासाठी नगरपालिका कोणत्याही प्रकारचे कर्ज काढणार नाही.असे सांगून पाणी योजनेबाबत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना मांडाव्यात असे आवाहन केले.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत ठेकेदार व अधिकाऱ्यांना घाम फोडला. यामध्ये त्यांनी 2024 पासून नवीन योजनेतील वेळोवेळी ज्या त्रुटी दाखवल्या होत्या, त्याची आठवण करून देऊन सगळ्या त्रुटी दूर करून, ही योजना लवकरात लवकर नगरपरिषद ने पूर्ण करून घ्यावी व नागरिकांना मुबलक आणि शुद्ध पाणी मिळावे अशी मागणी केली.यामध्ये
@ नळाला दररोज पाणी येण्यासाठी फिल्टर हाऊस ची क्षमता वाढवणे.
@ नदी पासून फिल्टर हाऊस पर्यंत आलेली पाईप लाईन अनेक ठिकाणी वळवून आणली आहे ती सरळ करून घ्यावी.
@ अंतर्गत पाईप लाईन साठी निकृष्ट पाईप वापरली आहे. ती बदलावी व गावभर उन्हात टाकलेली पाईप वापरण्यात येऊ नये.
@ बोगस नळ कनेक्शन घोटाळा झाला होता, त्यातील नागरिकांनी पैसे दिले पण त्यांना अनामत रक्कमेच्या पावत्या दिल्या नाहीत. त्या देण्यात याव्यात.
@ 5% नगरपरिषद हिस्सा भरण्यासाठी म्हणून नगरपरिषद वर कर्ज काढू नये. अशी मागणी केली व वरील त्रुटी तशाच ठेऊन जर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न झाल्यास, गावाच्या हितासाठी आम्हाला याविरोधात आंदोलन करावे लागेल असा इशाराही धनाजी चुडमुंगे यांच्याकडून यावेळी देण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, माजी सरपंच गजानन संकपाळ, बी.जी. माने, यादव आघाडीचे प्रवक्ते राहुल यादव, माजी नगरसेवक पंडित काळे, आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे, आनंदराव माने देशमुख, बांधकाम क्षेत्रातील तज्ञ अजय पाटील, नगरसेवक दीपक भाट, सचिन शिंदे, विजय आरगे, धनाजी पाटील नरदेकर, प्रकाश माळी, सामाजिक कार्यकर्ते शहाजी गावडे, कृष्णात देशमुख, भूषण गंगावणे यांच्यासह नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती मांडल्या.
यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव सर्व नगरसेवक, नगरसेविका, पाणी योजनेचे ठेकेदार, पालिकेचे अधिकारी, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व शिरोळचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे यांनी स्वागत केले. दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी आभार मानले.
पृथ्वीराजसिंह यादव यांच्या निर्णयाचे स्वागत :
शिरोळ शहराच्या पाणी योजनेसाठी यापूर्वी आंदोलन करण्यात आले. पाणी योजना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक बैठका झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करताना शहरातील नागरिकांच्या भावना आणि हरकती व सूचना समजून घेण्यासाठी पालिकेत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी घेऊन ही पाणी योजना पूर्णत्वास घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने पृथ्वीराजसिंह यादव यांचे अनेक नागरिकांनी आपले मत मांडताना कौतुक केले.
या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते कृष्णा देशमुख यांनी पाणी पुरवठा योजने बाबत एकदा आपले मत मांडल्या नंतर थोड्यावेळाने दुसऱ्यांदा आपले मत मांडण्याच्या प्रयत्न केला, त्यावेळी शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी एकदाच आपले मत मांडा, पुन्हा नाही. असे म्हंटले. यावर कृष्णा देशमुख यांनी आपले बंधु राहुल यादव यांनी 10 वेळा मत मांडल तर चालतय आणि आम्ही 2 वेळा मत मांडायच नाही काय ..? असा सवाल केल्यावर बैठकीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा